जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...
१ फेब्रुवारी २०२१ रोजी, उत्साहाने, जव्हारच्या कोर्टात जाण्यासाठी मी घरातून बाहेर निघालो . जव्हारला पोचल्यावर अगदी अर्धा तास शोध-शोध केल्यानंतर अखेरीस कोर्ट सापडला, कारण Google Map वर चुकीचे ठिकाण दाखवत होते व मी भलत्याच ठिकाणी जावून कोर्ट शोधत होतो.
तोंडाला लावलेला मास्क व्यवस्थित आहे याची खात्री केली आणि हाताला Sanitizer लावला आणि गळ्यात कॉलेजचा ID CARD घातला व कोर्टामध्ये प्रवेश केला. कोरोना काळ असल्याने आत मध्ये जास्त गर्दी नव्हती. आत मध्ये जावून मी कोर्टरूम शोधत होतो इतक्यात एका सफेद शर्ट-पेंट घातलेल्या कोर्टातील कर्मचाऱ्याने मला थांबवले आणि "काय काम आहे ?" म्हणून विचारले. "मी Law Student आहे आणि कोर्टातील कामकाज कसे चालते ते मला बघायचे आहे म्हणून मी कोर्टात आलो आहे" असं मी त्यांना अगदी उत्साहाने सांगितलं आणि कोर्टरूम कुठे आहे म्हणून विचारल.
साधारणपणे ५ मिनिटे त्यांचाशी बोलण झाल. त्यांनी माझा कॉलेज बद्दल व मी कुठे राहतो याबद्दल विचारपूस केली. तसेच LLB अभ्यासक्रमासाठी कसा प्रवेश घ्यायचा ? त्या साठी कोणती परीक्षा द्यावी लागते का ? आपल्या भागात कोणते Law कॉलेज चांगले आहेत ? असे त्यांचे प्रश्न होते. मी त्यांना याबद्दल माहिती दिली आणि कोर्टरूम च्या दिशेने वळलो. मनात खूप उत्सुकता होती, आज आपल्याला प्रत्यक्षात खटला कसा चालतो ते बघायला मिळेल, आरोपी पक्षाचे वकील उलटतपासणी (Cross-examination) कसे करतात ते बघायला मिळेल, सरकारी वकील पीडीत पक्षाची बाजू सक्षमपणे मांडतात का ? ते बघायला मिळेल !
आत्तापर्यंत कोर्टातील खटले के.डी. पाठक च्या अदालत TV सीरीज मध्ये, Jolly LLB सारख्या अनेक हिन्दी मुवीज मध्ये तसेच The Judge सारख्या अनेक इंग्लिश मुवीज मध्ये व वेबसीरीज मध्ये बघितले होते पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला कोर्टातील कामकाज प्रत्यक्षात बघयला मिळेल म्हणून मी खुश होतो.
जिना चढून कोर्टरूम च्या दरवाजा जवळ पोचलो इतक्यात एका तरुण वकिलाने मला अडवले व काय काम आहे म्हणून विचारले. मी त्यांना सुद्धा "मी Law Student आहे आणि कोर्टातील कामकाज कसे चालते ते मला बघायचे आहे म्हणून मी कोर्टात आलो आहे" अस सांगितलं. त्यांनी मला, पुढच्या वेळेपासून गणवेशात (सफेद शर्ट काळी पेन्ट ) येत जा असा सल्ला दिला तसेच कोर्टरूम मध्ये सध्या जागा नाही सांगून थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितले.
साधारणपणे १० मिनिटांनी २ वकील व काही माणसे बाहेर कोर्टरूम च्या बाहेर पडली आणि मी आतमध्ये प्रवेश केला. कोर्टरूम अपेक्षेपेक्षा खूपच छोटी होती. आतमध्ये सगळ्यांच्या पुढे न्यायाधीश (Magistrate) मास्क लावून बसले होते, ४-५ खुर्च्या होत्या त्यात वकील बसले होते आणि २ क्लार्क व त्यांच्या टेबलवर कॉम्पुटर व फाईलींचे भरपूर गठ्ठे होते. न्यायाधीश तसे तरुणच होते. मला त्यांची हेअर कट आवडली. त्यांचे केस एकदम व्यवस्थितपणे कापलेले व विंचरले होते.
इतर वकील बसले होते तिथे जावून मी बाजूला उभा राहलो कारण एकही खुर्ची रिकामी नव्हती.थोड्या वेळात एक म्हातारे आजोबा काठीचा आधार घेऊन लंगडत आतमध्ये आले त्यांच्यासोबत त्यांचा वकील आणि इतर काही माणस होती. त्यांच्या वकिलाने न्यायाधीशांकडे पुढची तारीख मागितली आणि ते निघून गेले.
असाच काही वेळ गेला पक्षकार व वकील हजर होत होते व पुढची तारीख घेऊन जात होते. थोड्या वेळात न्यायाधीशांनी मला "तुमच काय काम आहे ?" असा प्रश्न केला. मी लगेच गळ्यातील कॉलेजचा ID CARD दाखवत त्यांना सांगितलं "मी Law Student आहे आणि कोर्टातील कामकाज कसे चालतय ते बघतो आहे". त्यांनी मला तिथे असलेल्या लाकडी बाकावर बसून घ्यायला सांगितले व इतर वकिलांना उद्देशून म्हणाले "आज आपल्याकडे एक Law Student आला आहे आणि तो तुम्हाला बघतो आहे, तुम्ही चांगले काम करा, त्याला तुमच्या कडून काही तरी शिकायला मिळाल पाहिजे". न्यायाधीश हे म्हणताच बाकीचे सगळे वकील माझ्याकडे वळून बघू लागले. मी सुद्धा त्या सर्व वकिलांकडे बघून स्मितहास्य केले व मलाही तुम्हला भेटून आनंद झाला, अशा प्रकारचे हावभाव दिले. पण मी मास्क लावला असल्याने माझे स्मितहास्य व माझ्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांना कदाचित दिसलेच नसतील.
मला भूक लागली होती आणि तशी दुपारच्या जेवणाची वेळही झाली होती म्हणून कोर्टाच्या बाहेर जावून सैंडविच खावून परत कोर्टात आलो. इतक्यात १२ वी चा एक वर्गमित्र भेटला. तो त्याच्या गावातील एका मित्रा सोबत आला होता. त्याच्या मित्रावर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. ग्रामपंचायती मध्ये खूप भ्रष्टाचार करतात याचा राग मनात ठेवून त्याने एका रात्री ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. आणि त्याच्या विरोधात साक्षीदारही होते. थोड्या वेळाने वर्गमित्र आणि त्याचा मित्र निघून गेले.
कोर्टरूम मध्ये काही कामकाज होत नव्हते म्हणून तिकडे गेलो नाही. गर्दी नाही अशा ठिकाणी जावून एका बाकावर बसलो. समोरच सरकारी वकील (Public Prosecutor) यांच ऑफिस होत. आज आयुष्यात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांना भेटण्याची संधी होती आणि मी ती जाऊन देणार नव्हतो. त्यांच्या कामा बद्दल माझा मनात नेहमीच एक आकर्षण व आदर राहिला आहे.
"सर आत मध्ये येऊ का ? " अस विचारून आतमध्ये गेलो आणि स्वताची ओळख करून दिली. त्यांनी मला खुर्चीत बसायला सांगितले . आतमध्ये सरकारी वकिलां सोबत एक पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांच्या टेबलवर फाईलींचा गठ्ठा होता आणि त्या फाईलमध्ये सर्व कागदपत्र बरोबर आहेत हे ते तपासत होते व योग्य तो बदल करत होते.
साधारपणे ४५ मिनिटे सरकारी वकिलांसोबत बोलण झाल. ते बोलक्या स्वभावाचे होते. जवळपास १६-१७ वर्षापासून ते सरकारी वकील म्हणून काम करत होते. मला असलेले प्रश्न / शंका मी त्यांना आठवून आठवून विचारले. त्यांच्या कामाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले एखादा गुन्हा सिद्ध करणे हे कठीण काम आहे, पूर्ण कसोटी लागते. बऱ्याचदा साक्षीदार पलटतात (Hostile witness), बऱ्याचदा पीडित पक्षावर दबाव आणला जातो, तर कधी पोलिसांच्या तपासात त्रुटी राहतात पण आम्ही सुद्धा आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत असतो.
"लॉक-डाऊन नंतर आत्ताच कोर्ट चालू झालेत त्यामुळे सध्या दोन्ही पक्ष एकाच वेळी उपस्थित नसतात त्यामुळे जास्त कामकाज होत नाही. पण तु कोर्टामध्ये येत जा प्रत्यक्षात इथे कस काम चालते ते बघ, यातून तुला शिकायला मिळेल ", असा त्यांनी सल्ला दिला. "सर तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला" अस म्हणून मी त्यांचा निरोप घेतला आणि घराच्या दिशेने वळलो.
एक उत्कृष्ठ वकील व्हायचे असेल तर अजून आपल्याला खूप खूप मेहनत करावी लागेल, याची परत एकदा जाणीव झाली. :)