सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या


(Photo credit : Wolfgang Wuster)

 सर्पदंशाने सर्वात जास्त रुग्ण मृत्यु पावणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर लागतो. भारताला  सर्पदंश मृतांची राजधानी म्हणून ओळखलं जात.  २००१ ते २०२० या वीस वर्षांच्या कालावधीत भारतात १० ते १२ लाखापेक्षा जास्त मृत्यु हे सर्पदंशाने झाले आहेत. भारतात दरवर्षी  साधारणपणे ५०००० (पन्नास हजार ) बळी हे सर्पदंशाने जातात. (प्रत्यक्षात आकडा जास्त असु शकतो. यात ग्रामीण भागातील घरीच मृत्यु पावलेल्या रुग्णांची नोंद नाही.) 

सर्पदंश ही प्रामुख्याने  ग्रामीण समस्या असल्याने आतापर्यंत ही समस्या दुर्लक्षितच राहिली आहे अस मी म्हणेन. आणि हि प्रचंड संताप जनक बाब आहे.

सर्पदंशाचा सर्वात जास्त धोका हा तरुण शेतकरी आणि लहान मुले यांना असतो. पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाचे प्रमाण सर्वात अधिक असते. या काळात मनुष्य आणि साप यांचा जास्त संबंध येत असतो.

भारतात सर्पदंशास सर्वात जास्त कारणीभूत मुख्य चार साप आहेत त्यांना The Big Four म्हणून ओळखले जाते.
A) घोणस (Russell Viper)
B) नाग  (Indian Cobra)
C) फोडसा/ फोरसे (Saw Scaled Viper)
D) मन्यार (The common Krait )



भारतात सर्पदंशाने इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जातात  कारण :

१) ग्रामीण भागात रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत ,जवळपास पूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध असलेले दवाखाने नसतात, वेळेत अम्बुलंस ही मिळत नाही. बऱ्याचदा रुग्णाला एका दवाखान्यातून दुसर्या दवाखान्यात नेत असतानाच मृत्यू होतो.
 तसेच 
२) ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे प्रमाण पण आहे, बऱ्याचदा साप चावल्यावर सुरुवातीला  घरघुती पद्धतीने उपचार केले जातात, तांत्रिक-बाबा, भगत,ओझा यांचाकडे जावून उपचार घेण्याचे प्रमाण पण जास्त आहे. आणि हे देशातील प्रत्येक राज्यात होते.

विषारी सर्पदंशाचा उपचार फक्त दवाखान्यातच होवू शकतो. त्यावर औषध आहे "अँटीवेनम" ! (Antivenom) जे कि सापांच्या विषापासूनच बनवलं असत. आणि हे अँटीवेनम फक्त दवाखान्यातच असत.

दीड महिन्यापूर्वी माझ्या मामांचे अगदी वयाच्या २९ व्या वर्षी सर्पदंशाने निधन झाले. हा लेख त्यांना समर्पित.

सर्पदंश झाल्यावर परिस्थिती कशी हाताळावी या बद्दल आपल्यला जास्त माहिती नसते किवा प्रथोमोपचार कसा करावा याविषयी चुकीची माहिती असते.

हा लेख सर्पदंश झाल्यावर काय करावेकाय करू नये याबाबत  आहे. 

सर्पदंश झाल्यावर काय करावे :

१) अचानक साप चावल्यावर भीती वाटणे साहजिक आहे. भीती आणि तणावाने हृदयाचे ठोके वाढल्याने विष अधिक वेगाने शरीरारात पसरू शकते म्हणून रुग्णास शांत करणे दिलासा देणे आवश्यक आहे.  
साप चावलेल्या व्यक्तीस सतत मानसिक धीर द्यावा. त्या व्यक्तीस सांगावे कि तुला काही होणार नाही ,आम्ही आता  तुला  दवाखान्यात नेत आहोत तिथे इंजेक्शन दिल्यावर तुम्ही एकदम बरे व्हाल.

२) शक्य असल्यास कोणता साप होता ते बघावे , शक्य असल्यास त्या सापाचा फोटो किंवा विडीओ काढून घ्यावा. कोणता साप होता हे माहित असेल तर उपचार करताना डॉक्टरांना मदत होते. 
पण साप शोधण्यात तसेच सापाला मारण्यात अजिबात वेळ घालवू नये. साप चावल्यावर लवकरात लवकर रुग्णाला दवाखान्यात कस नेता येईल हेच प्राधान्य असल पाहिजे. (दवाखान्यात गेल्यावर किती वाजता साप चावला आणि कोणता साप होता या बद्दल डॉक्टरांना माहिती द्यावी )

३)प्रथमोपचार (First aid) म्हणून पायाला किंवा हाताला पट्टी गुंडाळून बांधावी. (pressure immobilisation technique चा वापर करून ).

 उदा. पायाला साप चावला असेल तर अगदी पायाच्या तळव्या पासून ते अगदी गुडघ्याच्या वरती पर्यंत पट्टी गुंडाळून बांधावी.

ती पट्टी कशी बांधावी ते खालील फोटो मध्ये आणि वीडीओ मध्ये बघा : 



पट्टी कशी बांधावी ते खालील वीडीओ मध्ये बघा : 


४) साप चावल्यानंतर विषामुळे तो भाग सुजण्याची शक्यता असते म्हणून हाता / पायातील दागिने , चप्पल , घड्याळ, अंगठी , कडा , बांगड्या  इ. वस्तू  काढून ठेवावे. सर्पदंश झालेला भाग मोकळा ठेवावा.


सर्पदंश झाल्यावर काय करु नये :

१) रुग्णास उपचारासाठी तांत्रिक / बाबा / भगत यांचाकडे नेऊ नये. विषारी सर्पदंशाचा उपचार फक्त दवाखान्यात होवू शकतो.
२)साप चावलेला भाग ब्लेड किवा इतर कशाने कापून रक्त बाहेर काढून, विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याने अधिक रक्त स्त्राव होवून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
३) विष तोंडाने शोषून काढू नये.
४) साप चावल्यानंतर  चहा , कॉफी , दारू यांचे सेवन अजिबात करू नये . यात कॅफेन आणि अल्कोहोल असते त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि विष अधिक वेगाने शरीरात पसरू शकते.
५) सापाला पकडण्याचा किवा मारण्याचा प्रयत्न करू नये. शक्य असल्यास सापाचा फोटो काढून घ्या.

६)साप चावलेल्या भाग एकदम गच्च बांधू नये.


एकदम गच्च गाठ बांधल्यास रक्तप्रवाह होत नाही आणि विष एकाच भागात राहते व तो अवयव निकामी किवा त्या  अवयावला अपंगत्व येण्याची शक्यता असते.

७) सर्पदंश झालेल्या भागाची जास्त हालचाल करू नये तो भाग स्थिर ठेवावा.


सर्पदंश झाल्यावर रुग्णाला चक्कर येणे , प्रचंड वेदना होणे, उलट्या होणे, स्पष्ट न दिसणे ,शरीराला खाज सुटणे  तोंडातून रक्त येणे इ. त्रास  कदाचित होवू शकतात पण आपण स्वतः घाबरून न जाता रुग्णाला सतत धीर दिला पाहिजे आणि लवकरात लवकर दवाखान्यात पोचवले पाहिजे.

सर्पदंश होवूच नये म्हणून काय काळजी घ्यावी :
सर्पदंश हे मोठ्या प्रमाणात मुख्यतः ग्रामीण भागात होत असतात,

१) सापांचे मुख्य खाद्य उंदीर, घूस आहेत. यांच्या शोधात ते घरामध्ये येत असतात. या उंदरांचा बंदोबस्त करावा म्हणजे साप यांच्या शोधात सहसा घरात येणार नाहीत.
२) रात्री झोपताना मच्छरदाणी बांधून झोपावे, त्यामुळे साप बिछान्यात शिरू शकणार नाहीत. ( मन्यार हा साप रात्रीच्या वेळीस अंधारात सर्वात जास्त  निघत असतो)
३) रात्री अंधारात फिरताना नेहमी बॅटरी  (Torch) सोबत ठेवावी आणि जपून पाय टाकावेत. सोबत एक काठी ठेवावी आणि चालताना जमिनीवर खट-खट आपटावी  त्याने साप पळून जातात.
४) साप लपून राहतील असी अडचण घरामध्ये व घराच्या आजुबजुला  ठेवू नये.
५) शेतावर गेल्यावर जमिनीवर पायाने किंवा गवतावर काठी ने आवाज करावे त्याने आजूबाजूला असतील तर ते पळून जातात. तसेच शेतावर जाताना गम बूट घालून जावे.
६)साप हे स्वताच्या शरीराचे तापमान नियंत्रित नाही करू शकत त्यामुळे ते थंडीच्या दिवसात बऱ्याचदा घरातील चुलीजवळ  बघायला मिळतात ( चुलीकडे गरम तापमान असते म्हणून ते उब शोधात येतात)
तसेच उन्हाळ्याच्या दिवसात गारवा शोधत अंधारात राहतात.

सर्पदंशाचा उपचार शक्य आहे , रुग्णाला लवकरात लवकर दवाख्यानात उपचार मिळाले पाहिजेत !


Author- Tushar Lahange
               (Law Student)

Popular posts from this blog

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

F.I.R. / Arrest

साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update

GOOD SAMARITAN LAW